अस्सं माहेर सुरेख बाई

डॉ. मेधा फणसळकर
19 Mar 2018

A+  A-


        माहेर म्हटलं की कितीतरी आठवणी मनात फेर धरून नाचू लागतात. वाड्यावाड्यातून भोंडल्याचा फेर धरून म्हटलेले टिपेचे सूर घुमू लागतात. “आक्कण माती चिक्कण माती …”, “कारल्याचा वेल लाव ग सुने मग जा अपुल्या माहेराला, कारल्याचा वेल लावला हो सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा …” — असे म्हणताना त्या सुनेवर होणारा अन्याय पाहून आम्ही जरा जास्तच आवेशात सासरला नावे ठेवत फेर नाचत असू. मग आमची ही सून रागावून माहेरी जायची ती कोणालाच मानायची नाही. सासू, सासरे, दीर, नणंद मनवायला आले तरीसुद्धा ही आपली चारी दरवाजे बंद करून झिपरी कुत्री सोडायची. शेवटी तिचे पतिराज यायचे, आणि मग ही सासुरवाशी सून खूष व्हायची आणि सासरी परतायची.

       गाणी पिढ्या न् पिढ्या तीच चालत आली आहेत. काळ बदलत होता आणि आता समाजातही खूप परिवर्तन झालंय. सासू नुसत्या सारख्या सूचना देणारी न राहता काही ठिकाणी मैत्रीणही बनू लागलीये. सासर-माहेरच्या सीमारेषा पुसट झाल्या आहेत. पण माहेरची ओढ आणि माहेरच्या आठवणी मात्र अजूनही प्रत्येक विवाहित स्त्रीच्या मनात कायमच्या घर करून असतात. प्रत्यक्ष भातुकली खेळताना आणि त्यात दमछाक होतानाही वाड्याच्या अंगणात किंवा ओसरीवर रंगलेला भातुकलीचा खेळ आणि ते सवंगडी, चुरमुरे, शेंगदाणे, आणि गुळाचा लुटूपुटूचा स्वयंपाक अजूनही माहेरच्या दारात नेऊन सोडतो.

         कृष्णाकोयनेच्या कुशीत आपले हातपाय पसरून सुखाने नांदणारे माझे गाव ‘कराड’! कुस्तीतील पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवणारे ‘खाशाबा जाधव’ माझ्याच माहेरचे. अवघ्या भारताचे भूषण असणारे ‘यशवंतराव चव्हाण’ माझ्याच माहेरचे. वासंती मुजुमदार, दीपा गोवारीकर या लेखिकाही माझ्याच माहेरच्या, तर प्रकाश संत यांनी जिथे आयुष्यभर वास्तव्य केले ते माझेच माहेर कराड. कित्ती कित्ती आठवणी या कुपीत दडून आहेत त्याची गणतीच नाही.

        कराड म्हटले की पहिल्यांदा आठवण येते ती नदी आणि घाटाची ! आमचं अवघं बालपण या घाटानं समृद्ध केलंय. माझा माहेरचा वाडा तर अगदी घाटाजवळच होता. त्यामुळे सकाळ दुपार संध्याकाळ आम्हाला कृष्णामाईचे दर्शन घडत असे. ती जणू काही आमची सखीच होती. सुट्टीच्या दिवसात तिच्या ऊबदार पाण्यात उड्या मारून पैलतीर गाठून परत येण्यात आमचे दोन-तीन तास सहज निघून जायचे. त्यामुळे ‘स्विमिंग’ शिकणे हे आमच्यासाठी फार मोठे आव्हान नव्हते. कराडातील मुलाबाळांना आपसूकच पोहायला जमायचे. संध्याकाळ तर वाळवंटात किल्ले करताना कधी संपायची ते कळायचेच नाही. सात वाजायच्या आत घरी यायचे असे. आजोबा – म्हणजे आमच्या – ‘दादांचे’ बंधन नसते, तर आम्ही अजूनही वाळवंटात रमलो असतो.

          संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी आमच्या सर्व घरातून शुभंकरोतीचे सूर घुमू लागायचे. पण आमच्या वाड्याचे एक वैशिष्ट्य होते. आमचा वाडा चक्क चित्रपटगृहाला चिकटून होता. त्याची आणि आमची भिंत कॉमन होती. त्यामुळे शुभकरोतीच्या साथीला मध्यंतरात फुटणाऱ्या सोडावॉटरच्या बाटल्यांचा ‘कडर् र् ….कट्ट ….’ असा फेरीवाल्यांनी बाटल्यांवर ओपनर फिरवून केलेला तो विशिष्ट आवाज आणि गोटी-सोड्याच्या बाटल्या उघडताना येणारा तो विशिष्ट ‘फुस्स्..’ असा आवाज, आणि गरम भजी आणि भेळेचा वास आमच्या शुभंकरोतीला साथ करायचा. वाड्यातील सर्व बिऱ्हाडांमधून कुकरच्या शिट्टया घुमू लागायच्या आणि माजघरात पुढ्यात दप्तर घेऊन अभ्यास ( ? ) करायला बसलेले आम्ही आईच्या हाकेची वाट पाहत असू. पोटात कावळे ओरडायला लागलेले असायचे आणि दिवसभर दमल्यामुळे डोळ्यांत  अक्काबाई (झोप) रेंगाळलेली असायची.

           आमच्या वाड्यातल्या मुलांचा आणखी एक उद्योग असायचा. त्या वेळी दूरदर्शनसारखी दृक्-श्राव्य माध्यमे घरोघरी बोकाळली नव्हती. त्यामुळे एखादा सिनेमा पाहणे म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच असायची. चित्रपटगृह आमच्या इतके जवळ असल्यामुळे शाळेत आमचा भाव नेहमीच वधारलेला असे. कारण दर शुक्रवारी बदलणारा सिनेमा पहिल्यांदा आम्हांलाच कळत असे. शुक्रवारी उठल्यावर पहिला कार्यक्रम म्हणजे माडीवरच्या खिडकीतून नवीन सिनेमा कोणता लागला ते पाहणे. दुसरी एक आमच्या फायद्याची गोष्ट अशी होती की चित्रपटगृहाच्या मॅनेजरच्या मुली आमच्या बरोबरीच्या असल्यामुळे त्यांच्याकडे खेळायला म्हणून गेले की आम्ही त्यांच्याबरोबर जाऊन हळूच पडदा बाजूला करून गॅलरीत कठड्याला टेकून उभे राहून सिनेमातील थोडा थोडा भाग बघत असू. डोअरकीपर येऊन ओरडला की आम्ही तेथून बाहेर पडून ज्या रूममधून सिनेमा दाखवत असत त्या रुममध्ये घुसत असू. ते ऑपरेट करणारे ‘ आप्पा ‘ मात्र आमचे चांगले मित्र होते. त्यांच्याजवळ बसून आम्ही छोट्या खिडकीतून दिसणारा सिनेमा पाहत असू. पण आम्हा मुलांना एखादा सिनेमा बघण्यासारखा नसेल तर मात्र आप्पा काहीतरी कारण काढून पिटाळून लावत आणि मग आमचा सर्व लवाजमा खेळण्यासाठी घाटावर रवाना होत असे.

            त्यावेळी आमच्या वाड्यातली संस्कृती म्हणजे एकत्र नांदत असणाऱ्या कुटुंबासारखी होती. आत्तासारखी “फ्ल्याट” संस्कृती नसल्यामुळे सगळ्यांचे दरवाजे सताड उघडे असत आणि कोणालाही कुठेही कधीही मुक्त प्रवेश असे. एखाद्या घरातील गृहिणी काही कारणाने बाहेरगावी गेली तर त्या घरातल्या समस्त इतर मंडळींची नाश्ता-जेवणाची सोय आपसूकच इतर दोन घरातील गृहिणी आनंदाने स्वीकारत. दिवाळीत आम्ही सर्व धाकटी मुले किल्ल्यासाठी माती आणायला सायकल घेऊन घाटावर रमलेलो असायचो, पुरुषमंडळी नोकरीतून वेळ मिळेल तसे घराची साफसफाई आणि रंगरंगोटीच्या मागे असत, आणि वाड्यातील सर्व बायका फराळाच्या तयारीला लागलेल्या असत. आम्हां सर्व धाकट्या भावंडाना मोठ्या तायाच असल्याने सर्व आयांनी त्यांना आपल्या हाताखाली मदतीला घेतलेले असायचे. मग एकेका घरातले फराळाचे पदार्थ सुरु होत. चकल्या, करंज्या सगळेजण रोज एका घरात एकत्र येऊन करत असत. आमची लिंबू-टिंबूची नजर मात्र कधी एकदा चकलीची चव चाखायला मिळते यावर असायची. चकली फस्त करून आमच्या स्वाऱ्या बाबांकडून पैसे घेऊन किल्ल्यावर ठेवायचे मावळे आणि शिवाजीमहाराज यांची खरेदी करायला सुटायच्या.

        उन्हाळ्याची सुट्टी लागली की आम्हा मुलांना वेध लागत ते पोहण्याचे आणि कृष्णाबाईच्या जत्रेचे ! चैत्र महिना सुरु झाला की गावात देवीचा मोठा उत्सव असे. वाळवंटात मोठा मांडव घातला जात असे. पूर्ण गावातून घराघरांतून तांदूळ आणि गहू गोळा केले जात असत. त्या तीन दिवसांत देवी वाळवंटात मांडवात आणली जायची. रोज गावजेवण असायचे आणि प्रसाद म्हणून मिळणाऱ्या गव्हाच्या खिरीच्या प्रसादाची तुलना इतर कुठल्याही पक्वान्नाशी होऊच शकत नव्हती. तीन दिवसांतला एक दिवस देवीच्या हळदी-कुंकवाचा असायचा. त्या दिवशी सर्व बायका देवीची ओटी भरण्यासाठी मांडवात गर्दी करत. बरोबर आंब्याची डाळ आणि काकडीच्या कापांची खिरापत असे. आम्ही मुले खास या खिरापतीवर डोळा ठेवूनच आईचा पदर धरून मागून जात असू. कारण ओटी भरून झाली की बायका एकमेकींना हळदी-कुंकू देऊन खिरापत वाटत असत. प्रत्येक घरातील वेगवेगळ्या चवीची खिरापत खाताना मजा येत असे आणि आम्ही लहान मुले म्हणून जरा कौतुकाने आणि सढळ हातानेच खिरापत मिळायची. देवीचे हळदी-कुंकू झाले की मगच गावात घरोघरी हळदी-कुंकू करण्याची प्रथा अजूनही गावात नित्यनियमाने पाळली जाते.

         शेवटच्या दिवशी देवी मांडवातून उठवून पूर्ण गावात पालखीने मिरवत असे. आमचे घर घाटाजवळ असल्यामुळे आमच्याकडे पालखी सर्वांत शेवटी येत असे. पण वाड्यात मात्र तीन-चार वाजल्यापासूनच गडबड सुरु होई. ओटीची तयारी, ओवाळण्याचे साहित्य, नवीन जरीच्या साड्या नेसून आयाबाया तयार होत. आम्हीही नवीन कपडे घालून, केसात मोगऱ्याच्या फुलांचे गजरे घालून तयार असू. मग एखादी काकू येऊन सांगायची -“ते बघा, ढोल ताशाचा आवाज ऐकायला येतोय, पालखी कुठपर्यंत आली ते बघून या बरं” मग आमच्या गाड्या सुसाट वेगाने पळत सुटायच्या आणि टेहळणी करून आलेले आम्ही आईला सांगायचो – ” आई, पालखी चावडी चौकात आलीय गं ! पुजारीकाका म्हणाले की तुमच्याकडे यायला अजून अर्धा तास तरी लागेल.” मग स्त्रीवर्ग निवांत व्हायचा आणि पुन्हा गप्पांमध्ये दंग व्हायचा. आम्ही मात्र इमानेइतबारे आमचे काम चालू ठेवायचो. दर दहा मिनिटांनी पालखीपर्यंत जाऊन आयांना त्याचे धावते वर्णन ऐकवायचो. मात्र पालखी बालाजी मंदिराकडे आली असे समजले की सगळ्या बायका हातात सर्व सामान घेऊन कोटाखाली येऊन थांबायच्या. शेजारीपाजारी एखादे नवीन बाळ अवतरले असेल तर त्याला पालखीखाली ठेवण्यासाठी आणलेले असायचे. मग आम्हीसुद्धा त्या वहिनीबरोबर बाळाला सांभाळण्यासाठी थांबायचो. नकळतपणे त्या बाळाला कोणताही त्रास होऊ नये याची नैतिक जबाबदारी आमच्या बालचमूने उचललेली असे. पालखी आली की आम्ही बालचमू सगळ्यांना बाजूला करून बाळाच्या आईला जायला वाट करून देत असू. बाळाला पालखी वर उचलून त्याखाली ठेवले जायचे आणि त्याच्यावरून पालखी नेली जायची. एवढे शिस्तीत झाले की एखादा गड जिंकल्यासारखा आनंद आमच्या तोंडावर असे.

        खरे पाहता जगाच्या नकाशावर माझे गाव तसे नगण्य. परंतु ज्या काळात आम्ही तिथे वाढलो त्या काळात शैक्षणिक, सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भता येण्यासाठी काही लोक धडपडत होते. पु.पां. तथा बाबुराव गोखले (माझे आजोबा), विनायकराव आळतेकर, काका करंबेळकर, यशवंतराव चव्हाण, पी.डी.पाटील यांसारखी स्वातंत्र्यसंग्रामात प्रत्यक्ष भाग घेतलेली मंडळी तरुणांना हाताशी धरून विधायक कामे करण्याच्या मागे होती. कराडमधील अनेक शिक्षणसंस्था, सहकारी संस्थांचा पाया यांनी घातला. त्या सर्वांचे फळ म्हणून म्हणा कराडात आम्ही शिकत असताना पुण्या-मुंबईच्या उत्तम शाळांच्या तोडीच्या शाळांमधून शिक्षण घ्यायला मिळाले. आणि आजही सांगायला अभिमान वाटतो की अजूनही आमच्या शाळेमधून तितक्याच आत्मीयतेने आणि तळमळीने शिकवणारे शिक्षक आहेत. सहकारी बँकांनीही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे ज्याचा पाया माझ्या आजोबांनी रोवला आणि कळस माझे बाबा आणि सहकाऱ्यांनी गाठला.

        माझे कराड आता शहराच्या तोडीचे मोठे झाले आहे. अनेक क्षेत्रात त्याने गरुडझेप घेतली आहे. लिहिण्यासारखेही भरपूर आहे. कितीतरी आठवणी फेर धरून नाचत आहेत. आठवणींचा गोफ गुंफता गुंफता लेखणी कुठे थांबवावी हेच कळत नाहीये. मनातला एक कोपरा कितीही रिता करायचे म्हटले तरी जादुगाराच्या कळशीतल्या कधीच रिकाम्या न होणाऱ्या गंगेप्रमाणे पुन्हा पुन्हा दुथडी भरून वाहतोय. पण शब्दांनाही कुठेतरी मर्यादा ठेवण्याची गरज आहे म्हणूनच पूर्णविराम देते.

डॉ. मेधा फणसळकर

डॉ.मेधा फणसळकर.
मु. पो. माणगाव
ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

View all posts


Want to support our writers and read great content while you're at it?

Subscribe to our WhatsApp list and stay updated. We never send spam messages.

Subscribe on WhatsApp

Subscribe via email