हॉलिवूडपट आणि मी

black and white movies, marathi article on hollywood, article marathi hollywood, varsha shende
1 min read

आजकाल माझ्या एक गोष्ट लक्षात आलीय,की माझा विशितला मुलगा जर टीव्ही पहात असेल अन् मी ही तिथे जाऊन बसले तर तो ताबडतोब चॅनेल बदलतो अन् ब्राऊझिंग चालू करतो.अं हं! अं हं!! तुम्हाला वाटतय् ते कारण नाही बरं! तो खूपदा इंग्लिश मूव्हीजच बघत असतो. आणि माझ्या प्रश्नांपासून बचाव करण्यासाठी तो असे करतो.  खरं सांगायचं म्हणजे, त्या सिनेमातली ती गोरी लोकं (आणि अफ्रो-अमेरिकनसुद्धा) जे काही तोंडातल्या तोंडात बरळल्यासारखं इंग्लिश बोलतात ते मला अगम्य असते. खालची सबटायटल्स वाचेस्तोवर वरची फ्रेम जाते आणि तो डायलाॅग कोणी बोललाय तेच कळत नाही. मला इंग्लिश येते किंवा समजते हा समजच हे मूव्ही खोटा ठरवतात. मग मी मुलाला सारखी पिडते “सांग ना, ही काय म्हणाली? तो असं का वागतोय? तो हिचा कोण? तो पलीकडचा आपला का शत्रूचा?” मग आता इतक्या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा तो चॅनेल बदलणं पसंत करतो.

‘गन्स आॅफ नॅव्हॅराॅन ‘ पहाताना ‘हा आपला का शत्रूचा ‘ हा प्रश्न तर मी इतक्या वेळा विचारला की बस्स् ! म्हणजे कसं ना तो समोरचा माणूस मार खात असताना आपल्याला वाईट वाटायला पाहिजे की आनंद, हे त्या उत्तरावर मला ठरवायचे असते.

एखाद्या क्लासिकवर जर मूव्ही काढला असेल तर माझा सल्ला आहे, आधी कादंबरी वाचा न् मग मूव्ही पहा. म्हणजे जरातरी कळेल. पुण्यात अलकाला मी काही फिरंगी (काॅन्ह्वेंटमधून शिकलेली) मित्रमैत्रिणींबरोबर ‘गाॅन विथ द विंड ‘पाहिला होता.समजल्याचा आव आणला पण ओ किंवा ठो कळला नाही. तो ह्रेट बटलर क्षणात त्या स्कार्लेटचे मुके काय घेतो आणि पुढच्या क्षणाला थोबाडीत मारुन ढकलून काय देतो काहीच कळाले नाही. शेवटी कँपमध्ये फूटपाथवर १००रु ला ही कादंबरी मिळाली, ती अधाशासारखी वाचून काढली. तेव्हा त्यांचे लव्ह अँड हेट रिलेशन समजले. मग मुद्दाम सीडी आणून पाहिली न् प्रचंड आवडला!

‘काँजरींग – २’ हा ही खूप भयानक भूतपट आहे म्हणतात, पण त्याचाही प्रश्न विचारुन विचारुन इतका काॅमेडीपट केला की त्या भुताची बिल्कुल भीतीच वाटेना. ऐन मोक्याच्या क्षणी ती पात्रे अस्पष्ट पुटपुटत काहीतरी सिक्रेट सांगत असतात, ते कितीही जिवाचा कान करुन ऐकले तरी समजत नाही मग प्रश्न विचारणे भागच आहे नां? मला तर कधी कधी त्या संवादात मराठी किंवा हिंदी शब्दच ऐकू येतात!

ही सबटायटल्स वाचून वाचून मला तर एक डोळा आकाशाकडे आणि एक डोळा जमिनीकडे असा तिरळेपणाच निर्माण होईल असे वाटते. मध्ये व्हाॅटस्सपवर फोटो आला होता नां, तसा! मग याला एक उपाय म्हणजे डब्ड मूव्हीज पहाणे. मग बेअर ग्रील्स बोलतो “जनाब, जनाब, ये ताजा ताजा आॅक्टोपस मैं अभी खा लूंगा. ये मुझे प्रोटिन देगा” किंवा हिस्र्टी चॅनेलवरचा तो चष्मिश दाढीवाला बोलतो, “प्राचीन सभ्यताओं के अनुसार देखा जाये तो..” किंवा जाॅनी ब्राव्हो एखाद्या मुलीच्या मागे “ए हसीना..” म्हणत जाताना पहायला पण विचित्र वाटते. हे म्हणजे अँजेलिना जोलिला नऊवारी नेसवून सत्यनारायणाच्या पूजेला बसवल्यासारखे वाटते नां? या सबटायटल्सची अजून एक मजा म्हणजे मराठी सिनेमांचे इंग्लिश सबटायटल्स पण नको नको म्हणतही आपोआप वाचली जातात, की बघू तरी त्यांनी काय भाषांतर केलंय पहायला! अन् पुन्हा तोच वैताग.धड वर लक्ष नाही धड खाली लक्ष नाही. ‘उडता पंजाब’ मध्ये तर शिव्यांची इंग्लिश भाषांतरे वाचून खो खो हसलो होतो.

एकदा तर मी ‘फास्ट अँड फ्युरियस’चा कितवातरी भाग एकटीने पहायची हिंमत केली होती. अन् शेवटी शेवटी संपताना माझा मुलगा, वरुण आल्यावर कळले की मी ज्यांना व्हिलन समजत होते तेच हीरो आहेत. यावर डोक्यावर हात मारुन तो म्हणाला, “माते, आता याला एकच उपाय. एकतर कृपा करुन आता हे मूव्ही पहाणं बंद तरी कर किंवा सारखे सारखे बघत तरी जा, म्हणजे तुला सवय होईल!”

सध्या तरी याबाबतीत माझा इंटरव्हल झालाय. तर मी जाते आता पाॅपकाॅर्न खायला! तूर्तास तरी टा टा…

– डॉ वर्षा सिधये

Leave a Reply

Be the first to find out when a new post is published. We won’t spam you. Promise! 🙂

Receive updates via WhatsApp

Or you can subscribe via e-mail:


Close
%d bloggers like this: