“आहेर”

Dr Madhav Mutalik
11 Feb 2018

A+  A-

मॉरिशसबद्दल ऐकलं खूप होतं. माझ्या तिथल्या नोकरीचा तिसरा चौथाच महिना असेल. प्राध्यापक आणि डॉक्टर्स मंडळींइतकाच मी, शिपाई, सफाई कामगार, कारकून, तंत्रज्ञ, सुरक्षारक्षक, ड्रायव्हर अशा सर्व प्रकारच्या लोकांमध्ये नेहमीच सहज मिसळतो. जॉन माझ्याच विभागात कारकून म्हणून काम करायचा. तिथल्या सगळ्याच लोकांप्रमाणे जॉन इंग्रजी किंवा मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये माझ्याशी बोलायचा.

एके दिवशी मला म्हणाला –

“नंदिताचं ऑपरेशन झालंय. दहा दिवस झाले. काल तिला घरी आणलंय. आम्ही सगळे जेवणाच्या सुट्टीत तिला भेटायला निघालोय. सर, तुम्हांला यायचंय का, आमच्याबरोबर ?”

–“नंदिता? म्हणजे ती लायब्ररीमध्ये साफसफाई करते ती ? कशाचं ऑपरेशन ? काय झालं होतं ? मला कोणी बोललं कसं नाही ?”

–“सर, मुद्दामच तिनं फार कुणाला सांगितलं नाही. आतड्याचा कॅन्सर. शिवाय तुम्ही अजून थोडे नवीन आहात ना…”

–” बरं, जाऊ या. मला हाक मार जाताना.”

–“सर, तीन मेटाडोर गाड्या सांगितल्या आहेत भाड्याच्या. आपण वीस-बावीस जण होऊ. प्रत्येकी तीस-तीस रुपये काँट्रिब्युशन ठरलंय”

–“हो, ठीक आहे, हे घे माझे पैसे”

–“सर, आणखी एक गोष्ट आहे – सांगू का?”

–“अरे, सांग ना”

–“सर, तिला पाकिटात घालून प्रत्येकजण काही ना काही रक्कम देणार आहे. आपापल्या मनाप्रमाणे”

–“रक्कम?”

–“हो. आमच्या मॉरिशसमध्ये आम्ही असं करतो. कुणी आजारी असेल तर, किंवा कुणाच्या घरात कुणाचा मृत्यू झाला म्हणून भेटायला गेलो तर, आम्ही रिकाम्या हाती जात नाही. सर, तुमच्याकडे ते “आहेर” की काय असतं ना, तसं.

मी क्षणभर शांत झालो. जॉनला “आहेर” म्हणजे काय हे समजावून सांगण्याची ती वेळ नव्हती. “आहेर” हा शब्द त्यानं ऐकीव माहितीच्या आधारे वापरला असावा.

मी म्हंटलं – “ओ के, गुड”…..

पंधरा-वीस मिनिटांनी एक लखोटा आमच्या विभागात आला. त्यात आधीच नोटा होत्या कोणी कोणी घातलेल्या. जॉनने त्याच्या इच्छेप्रमाणे त्यात पैसे घातले.  मीही त्यात मला घालायचे तितके पैसे घातले. किती घातले, काय घातले – चर्चा नाही की प्रश्न नाही.

लखोट्यावर कोणी काही लिहिले नव्हते…… कोणाची  नावं नाहीत, यादी नाही, रक्कम नाही.

जेवणाच्या सुटीत गाड्या आल्या. आम्ही सगळे नंदिताच्या घरी गेलो. सगळे तिच्याशी प्रेमाने बोलले. अगदी थोडक्यात, शांतपणे; हसून – पण गंभीरपणे; पोक्तपणे – पण प्रसन्नपणे.   कुठलाच अतिरेक न करता. मनापासून पण मोजक्या शब्दांत, वायफळ बडबड आणि विषयांतर न करता !

जेमतेम दहा पंधरा मिनिटं आम्ही असू तिथं. मग बाहेर पडलो. मी जॉनकडं पाहिलं. त्याच्या आविर्भावातून मला समजलं, की ते रकमेचं पाकीट पोचतं झालं आहे.

दोन-तीन दिवसांनी मी जॉनला म्हंटलं – “जॉन, आवडली मला तुमच्या मॉरिशसमधली पद्धत. कसं काय सुचलं हे तुम्हांला?”..

जॉन म्हणाला –

“माहीत नाही. कोणी सुरु केलं, कधी सुरु झालं माहीत नाही. सर, कसं असतं ना – लग्न, वाढदिवस इत्यादी समारंभात ज्याने त्याने खर्चासाठी आपापली सोय केलेलीच असते. तेव्हा खरं तर कोणी कोणाला काही देण्याची गरजसुद्धा नसते. पण – आजारपण, ऑपरेशन, एखाद्याचं मरण हे काही सांगून येत नाही. ध्यानीमनी नसताना अचानकच काही तरी घडतं.”

“खरं आहे, जॉन तू  म्हणतोस ते.”…. मी म्हंटलं.

जॉन पुढं म्हणाला – “तेव्हा आपण उगीच कुणी कुणाला मागण्याची, देण्याची, आणि काही पैसे लागणार आहेत का असं विचारण्याची वाट कशाला बघा — भेटायला जाताना जमेल तितका आहेर गुपचूप देऊन मोकळं व्हायचं. पट्कन पैसे उपयोगी येतात अडचणीच्या वेळी.”

……जॉनचे हे शब्द मी जपून ठेवले आहेत.

Dr Madhav Mutalik

कवी, लेखक, उत्कृष्ट निवेदक विद्यार्थीप्रिय वैद्यकीय शिक्षक जुन्या हिंदी गीतांचा चाहता!

View all posts


Want to support our writers and read great content while you're at it?

Subscribe to our WhatsApp list and stay updated. We never send spam messages.

Subscribe on WhatsApp

Subscribe via email