परवा सहज आरशात बघून केस विंचरताना एक पांढरा केस अवतरला. खोलीत कोणी नाही असे पाहून हळूच उपटणार तेवढ्यात कन्यारत्न टपकले.
“आई, काय करतेस गं ? बघू! अगं, तुझा केस पांढरा झालाय. मागच्या वेळी मी उपटला होता तसा उपटू? पण, आई म्हणजे तू आता आज्जीसारखी म्हातारी होणार का गं? “
“चूप बस! म्हातारी व्हायला मी अजून चाळिशीसुद्धा पार केली नाही आणि माझा एकच केस पांढरा झालाय; तुझ्या बाबांचे बघ किती केस पांढरे झालेत ते!” – इति अस्मादिक.
“पण आई, बाबांना तर चाळीस वर्षे पूर्ण झाली ना? मग त्यांचे केस पांढरे होणारच ना ? ”
मी म्हटलं , “कशावरून?” — त्यावर माझ्यावरच बूमरॅंग उलटले.
“तूच म्हणालीस ना, की माझी चाळिशीसुद्धासुद्धा झाली नाही म्हणून ?…..”
कन्येची टकळी थांबवीत मी पट्कन म्हटलं, “अगं, तुला नवीन ड्रेस घ्यायचा आहे ना? चल, मी बाजारात चाललेय तर तिथेही जाऊ”.
त्यामुळे गाडी दुसऱ्या विषयावर वळली आणि मी मनातल्या मनात हुश्श् केले; पण मेली ती चाळिशीची झुळूक मनात सतत हेलकावे खात होती.
नंतर भाजी घ्यायला बाजारात गेले. भाजीवाल्याने भाजीचे भाव सांगितल्यावर मी म्हटलं,
“काय हो, हल्ली तुमच्या भाजीला सोन्याचे भाव आलेत की काय, आता थोड्या दिवसांत भाजी खाणंच सोडलं पाहिजे”.
भाजीवाला म्हणाला, “काय करणार मावशी? ……. वगैरे वगैरे “ —– “मावशी?” !!!!! — मी एकदम दचकलेच. काल परवापर्यंत ताई–वहिनी वाटणाऱ्या आपण खरोखरच मावशी वाटायला लागलोय की काय?….. जरा रागानेच त्या भाजीवाल्याकडे पाहिले. तोपर्यंत कन्या पचकलीच – “अगं आई, ते काका काय विचारतात बघ! तुझं लक्ष कुठंय? ते विचारतायत की किती पेंड्या देऊ मावशी म्हणून”. मी पट्कन भाजी घेतली आणि मंडईच्याबाहेर पडले. तरी ती चाळिशी मनात पिंगा घालतच होती.
उन्हातून घरी आले. आल्याआल्या आधी फॅनखाली बसले. फ्रीजमधील थंडगार पाणी ग्लासमध्ये ओतून घेत होते तेवढ्यात कन्या म्हणाली, “आई, तुला उन्हाचा त्रास होतो ना? तू जरा विश्रांती घे. मी पट्कन श्रेयाची वही देऊन येते. तिला लगेच हवी आहे. मग मी आल्यावर आपण जेवू.“
“अगं, पण केवढं ऊन रणरणतंय. आत्ताच वही द्यायला हवी का? संध्याकाळी दिली तर चालणार नाही का? ”
“काही नाही ग! एवढं ऊन कुठंय? मी पाच मिनिटात येते”. “
अगं,अगं …..” म्हणेपर्यंत बाईसाहेबांची सायकल सुसाट गेलीसुद्धा! …. मला माझे बालपण आठवले. त्या वेळी आम्ही मैत्रिणीसुद्धा अशाच उन्हात भटकत असू. वडीलमंडळी वामकुक्षी घ्यायची त्यावेळी गच्चीत किंवा अंगणात एखाद्या सावलीत आमचा भातुकलीचा संसार मांडला जायचा. त्यावेळी ऊन-पाऊस याची फारशी तमा नसायची. उन्हात अनवाणी फिरायला मजा यायची; पण आतून आई ओरडायची, “अगं , उन्हात उगाच कशाला फिरतेस? चप्पल तरी घाल”. शाळेतून येताना पाऊस पडायला लागला की ‘आठवणीने’ घरी छत्री विसरणाऱ्या आम्ही पावसाची मजा घेत घरी यायचो. ओले कपडे बदलायची इच्छा नसतानाही आईच्या भीतीने मी कपडे बदलत असे.
त्याच आपण आता ‘आईच्या’ भूमिकेत शिरल्यावर आईसारख्याच वागू लागलोय हे लक्षात आले आणि
त्याचवेळी माझ्या चाळिशीने मला वेडावून दाखविले. मी तिला पट्कन मनात दडपून टाकले.
संध्याकाळी मला भिशीला जायचे होते. जाताना नवऱ्याला सांगायला गेले तर म्हणतो कसा, “कसली भिशी करता? भिशीच्या नावाखाली खाबूगिरी आणि कुचाळक्या याशिवाय करता काय? आता जरा वयानुसार वागा”. मलाही राग आला.
मी म्हटलं , “तुम्ही तरी काय करता रे सर्व मित्र एकत्र आल्यावर ? पत्ते, सिगारेट, गप्पा – शिवाय आणखी काय काय ….”
त्यावर मला थांबवत तो पट्कन म्हणाला – “ बरं, बरं असू दे; पण खाण्याबरोबर थोडी फिगरही बघा. नाहीतर ऐन चाळिशीतच सगळे आजार चालू होतील”. माझ्या नवऱ्याचे बोलणेही मोजकेच आणि खाणेही मोजकेच. त्यामुळे माझ्यासारख्या सुदृढ महिलेला उपदेश करायची एकही संधी तो सोडत नाही.
त्याच्या तोंडून पुन्हा चाळिशीने डोके वर काढले आणि मी तिला रागाने दटावले.
नंतर रात्री टीव्हीवर झी सारेगम हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सुरु झाला. मराठीत उत्कृष्ट गाणारी नॉनमहाराष्ट्रीयन ‘अभिलाषा चेल्लम’ कुठलंतरी अगम्य हिंदी गाणं गात होती आणि परीक्षकांसह सगळे सेलीब्रिटीसुद्धा स्टेजवर नाचत होते .म्हणून मुलांना विचारलं, “कोणतं रे हे गाणं?” — तर संपूर्ण चित्रपटाचा इतिहास-भूगोल त्यांनी मला उलगडून सांगितला. नट-नट्यांपासून गायक–गायिकांपर्यंत सगळेच मला अद्भुत होते आणि माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून मुले “आई किती अडाणी आहे” अशा भावनेने बघत होती. मला पट्कन माझ्या आईचा चेहरा आठवला. कारण त्या वयात आम्हीही आमच्या आईला असेच केविलवाण्या नजरेने न्याहाळत असू.
आता माझी चाळिशी माझ्याकडे बघून खदाखदा हसू लागली आणि मी मात्र तिच्याकडे डोळे वटारून पाहू लागले.
मग मात्र मी सरळ तिथून उठले आणि झोपायला अंथरुणावर पडले. पाठ आणि कंबर बोलू लागली. नकळत माझेच हात माझ्या पायावरून फिरू लागले आणि माझी चाळिशी माझ्यासमोर पदर खोचून उभी राहिली आणि म्हणाली,” पाहिलेस ना? माझ्याकडे दुर्लक्ष करतेस; पण मी तुझी अशी–तशी पाठ सोडणार नाही. शाळा-कॉलेजमध्ये होतीस तेव्हा त्या शरीराची पर्वा केली नाहीस. आता होतोय ना त्रास? ते बापडे शरीर तरी किती दिवस सहन करणार? आता त्या शरीरावरचा भार जरा कमी करा. खाण्यावर नियंत्रण ठेवा आणि मुख्य म्हणजे व्यायाम करा. आणि काय गं, कॉलेजमधून घरी यायला उशीर झाला तर आई काळजी का करायची ते समजलं ना? आज साधं मुलीला क्लासला एकटीला पाठवताना दहा वेळा विचार करतेस. ती घरात येईपर्यंत जिवात जीव नसतो ना? अगं , “नेमेचि येतो मग पावसाळा” या न्यायाने प्रत्येकजण त्या–त्या वयात त्या–त्या भूमिकेत शिरतच असतो. आणि ती–ती भूमिका त्या–त्या मानसिकतेने निभावत असतो, आणि दुसरे — चाळिशी आली म्हणजे तरुणपण संपले असे कोणी सांगितले? शरीर तंदुरुस्त आणि मन तरुण ठेव आणि माझे मुक्त मनाने स्वागत कर”.
हे सर्व ऐकले आणि मी एकदम उत्साहित झाले.
प्रथम सकाळी लवकर उठून फिरायला जायचा निश्चय केला. डायेटिशियनचा नंबर शोधून ठेवला आणि चाळिशीला शेजारी झोपवून मस्त स्वप्नात रममाण झाले.
माझी चाळिशी
डॉ. मेधा फणसळकर
10 Feb 2018
A+ A-